Image Source:(Internet)
मुंबई :
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, आज सकाळी ठाकरे बंधूंनी शिवसेना भवनात ‘शिवशक्ती वचननामा’ सादर करत प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला. त्यानंतर संध्याकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) यांनी आपल्या पारंपरिक दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ मध्ये उपस्थिती लावत राजकीय वातावरण तापवले.
हा तोच प्रभाग आहे जिथे दिवंगत शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, त्यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा)कडून धनश्री कोलगे उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी दहिसरमध्ये येताच दिवंगत अभिषेक घोसाळकर यांचा उल्लेख करत भाजपवर आणि तेजस्वी घोसाळकरांच्या प्रचाररणनीतीवर थेट बोट ठेवले.
भावनिक प्रचारावर ठाकरेंची प्रत्युत्तर चाल-
तेजस्वी घोसाळकर आपल्या प्रचारादरम्यान वारंवार दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणींना उजाळा देत असल्याचे चित्र दिसत आहे. याला मतदारांमध्ये भावनिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात असताना, उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून भाजपवर पलटवार केला.
“आज मला खरंच अभिषेकची आठवण येते आहे. अभिषेक असता, तर भाजपची इथे उभं राहण्याचीही हिंमत झाली नसती,” असे ठाम विधान करत उद्धव ठाकरेंनी राजकीय संदेश दिला.
विनोद घोसाळकरांचे कौतुक, ‘फुट पाडणाऱ्या वृत्ती’वर हल्लाबोल-
यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत विनोद घोसाळकर यांचेही भरभरून कौतुक केले. “विनोद घोसाळकर हे शिवसेनाप्रमुखांचे कट्टर शिवसैनिक होते. मला त्यांचा अभिमान आहे,” असे सांगत त्यांनी भाजपवर ‘घरफोडीची राजकारणं’ केल्याचा आरोप केला.
“ज्यांनी घरं फोडली, घराघरांत भांडणं लावली, त्यांनीच आज विनोद घोसाळकरांच्या घरात फूट पाडली. त्या फुटीर वृत्तीचा पराभव करण्यासाठी मी इथे आलो आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट निशाणा साधला.
व्यक्तीविरोध नाही, भाजपविरोध आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझा विरोध तेजस्वी घोसाळकर यांच्याशी वैयक्तिक नाही. पण ज्यांनी त्यांना फोडले, त्या भाजपविरोधात मी ठाम उभा आहे. भाजपचा पराभव करण्यासाठीच मी दहिसरमध्ये आलो आहे.”
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे दहिसर प्रभागातील लढत अधिकच चुरशीची झाली असून, प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे.