महापालिका रणधुमाळीत ठाकरे गटाला मोठा हादरा; शिंदे गटात लक्षणीय पक्षप्रवेश

    05-Jan-2026
Total Views |
-- महायुतीची राजकीय पकड अधिक मजबूत
Shinde Thackeray group
Image Source:(Internet) 
 
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांची रणनीती कसोटीला लागली आहे. शेवटच्या क्षणी अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने अनेक ठिकाणी समीकरणे पूर्णतः बदलली आहेत.
 
महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी अचानक घेतलेल्या माघारीचा थेट फायदा महायुतीला झाल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असून, याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचे दिसत आहे.
 
नागपुरात घडलेल्या घटनेमुळे ठाकरे गटाची अडचण अधिक वाढली आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार गौरव महाजन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यासोबतच त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजय दलाल यांना उघड पाठिंबा जाहीर केला. गौरव महाजन यांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने नागपुरात शिंदे गटाचे बळ वाढले असून ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
 
जळगावमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. तेथील ठाकरे गटाच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
 
एकूणच राज्यातील विविध महापालिकांमध्ये अपक्ष तसेच महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या माघारीमुळे महायुतीला मोठा फायदा झाला आहे. आतापर्यंत महायुतीचे 57 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती असून, ही बाब महाविकास आघाडीसाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.