Image Source:(Internet)
मुंबई :
राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली असून, या योजनेत आतापर्यंत सुमारे अडीच कोटी महिलांचा समावेश झाला आहे. मात्र, अलीकडे लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे अनेक लाभार्थी महिलांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, केवायसी (KYC) पूर्ण करूनही काही महिलांना आता मासिक १५००चा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
केवायसीसाठी मुदत संपली-
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. शासनाने यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित केली होती. ही मुदत संपल्यानंतर ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यानंतर केवायसीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
केवायसी असूनही लाभ का थांबणार?
महत्त्वाची बाब म्हणजे, केवायसी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना लाभ मिळेलच असे नाही. केवायसीदरम्यान लाभार्थींची सविस्तर माहिती तपासली जात असून, पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलांना अपात्र ठरवले जाणार आहे. अशा महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जातील.
उत्पन्न व वय ठरणार निर्णायक-
पडताळणीदरम्यान महिलांचे तसेच त्यांच्या वडील किंवा पतीचे वार्षिक उत्पन्न तपासले जात आहे.
२.५ लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.
तसेच, शासनाने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेत न बसणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळले जाणार आहे.
अपात्र लाभार्थींवर कडक कारवाई-
योजनेचा लाभ केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी सरकारने ही पडताळणी प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना, केवायसी असूनही, १५००चा मासिक हप्ता मिळणार नाही, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या बदलांमुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, शासनाकडून स्पष्ट आणि अधिकृत मार्गदर्शन देण्याची मागणी केली जात आहे.