Image Source:(Internet)
मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ उतरण्याच्या प्रक्रियेत असताना धावपट्टीच्या आसपास कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विमान अचानक एका बाजूला झुकून शेतात कोसळल्याचे त्यात दिसत आहे.
अजित पवार यांच्या अकाली जाण्याने केवळ पवार कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. काल बारामतीसह राज्यभर शोक पाळण्यात आला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या आवारात त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. पक्षाने निवडणूक प्रचारावर मोठी मर्यादा घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार कोणत्याही प्रकारच्या प्रचार सभा, रोड शो किंवा जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाहीत. उमेदवारांनी घरोघरी जाऊन शांतपणे फक्त पत्रकांच्या माध्यमातूनच प्रचार करावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
इतकेच नव्हे, तर निवडणुकीत यश मिळाल्यानंतरही कोणतीही विजय मिरवणूक काढू नये, असेही पक्षाने बजावले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, अशा दुःखद वातावरणात तोंडावर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.