सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? फडणवीस–पटेल भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

    30-Jan-2026
Total Views |
 
Sunetra Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्य सरकारमधील महत्त्वाच्या पदांबाबत निर्णयप्रक्रिया सुरू झाली आहे. अजित पवारांकडे असलेले उपमुख्यमंत्री (DCM) पद आणि अर्थमंत्री खाते पुढे कोण सांभाळणार, यावर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
 
या भेटीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना अधिकच वेग आला आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या रिक्त झालेल्या जागेबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले. पक्षातील सर्व आमदारांशी चर्चा करून, जनतेची भावना आणि अजित पवारांच्या योगदानाचा विचार करतच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत थेट चर्चा झाल्याचे पटेल यांनी नाकारले असले, तरी हा विषय पक्षाचा अंतर्गत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच त्या जागेवर योग्य व्यक्ती निवडली जाईल आणि त्यामागे आमदारांची तसेच जनतेची भावना महत्त्वाची असेल, असेही त्यांनी नमूद केले.
 
दरम्यान, अजित पवारांच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्याबाबतही संकेत देण्यात आले आहेत. सध्या शोकाकुल वातावरण असल्याने घरातील विधी पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. ही जागा लवकरात लवकर भरावी लागणार असल्याचे सांगत, अंतिम निर्णय जनभावनेच्या अनुरूपच घेतला जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी सूचित केल्याने राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.