राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? अर्थ, ऊर्जा आणि गृह खात्यांबाबत हालचाली; राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग

    30-Jan-2026
Total Views |
 
Maha cabinet
 Image Source:(Internet)
मुंबई:
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बुधवारचा दिवस अत्यंत दुःखद आणि अस्वस्थ करणारा ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख नेते अजितदादा पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर सत्ताधारी आघाडीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या असून मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांबाबत नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
 
अजित पवार यांच्या निधनामुळे आता राज्याचा येणारा अर्थसंकल्प कोण सादर करणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून सुनेत्रा पवार यांचे नाव संभाव्य पर्याय म्हणून पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली खाती तसेच संपूर्ण मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिल्याने चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. या भेटीत मंत्रिमंडळातील फेरबदल, उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर चर्चा तसेच राष्ट्रवादीकडील खात्यांचे पुनर्वाटप यासंदर्भात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
 
अजित पवार यांच्या जाण्यानंतर मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आता अधिक ठळकपणे दिसून येत आहे. त्यांच्या ताब्यात असलेली महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्र्यांकडे सोपवली जावीत, यासाठी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र दिले जाण्याची तयारी सुरू आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
 
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पवार कुटुंबातील प्रमुख नेते लवकरच एकत्र बसून या विषयावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. याआधी झालेल्या बैठकींमध्ये अजित पवार गटाकडून स्वतः अजित पवार सहभागी होते, तर शरद पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते. मात्र आता परिस्थिती बदलल्याने निर्णय कुटुंबपातळीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. कोणाला कोणते खाते दिले जाईल याची माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगत त्यांनी भाजपला सर्वच महत्त्वाची खाती स्वतःकडे हवी असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा, गृह आणि जीएडीसारखी मोठी खाती असून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असून, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी भावना अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनीही दोन्ही पक्ष एकत्र येणे हे पक्षाच्या आणि राज्याच्या दृष्टीने योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले. अजित दादा हयात असताना त्यांचीही हीच इच्छा होती, असे त्यांनी स्पष्ट केले.