HSRP नंबर प्लेटबाबत दिलासा; जुनी वाहने जप्त होणार का? जाणून घ्या सध्याची स्थिती

    03-Jan-2026
Total Views |
 
HSRP number plates
 Image Source:(Internet)
मुंबई :
जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपल्यानंतर राज्यभरातील वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मुदत संपल्यानंतर दंडात्मक कारवाई, परवाना रद्द किंवा थेट वाहन जप्तीची भीती अनेकांच्या मनात होती. कारण या मुदतीनंतर कोणतीही अधिकृत मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नव्हती.
 
मात्र, आता वाहनधारकांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाने तूर्तास HSRP नसलेल्या जुन्या वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ज्यांच्या वाहनांवर अद्याप नवीन नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना सध्या तरी मोठा दिलासा मिळाला आहे.
 
राज्यात जुन्या वाहनांना HSRP बसवण्यासाठी यापूर्वी रोमजार्टा सेफ्टी सिस्टिम्स, रिअल मेजॉन इंडिया आणि एफटीए HSRP सोल्यूशन्स या तीन खासगी एजन्सी नियुक्त करण्यात आल्या होत्या. मात्र या कंत्राटदारांची मुदत संपल्याने संपूर्ण प्रक्रिया थांबली आहे. आता परिवहन विभागाने नव्या एजन्सीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, नवीन कंत्राटदार निवडण्याचे काम सुरू आहे.
 
जोपर्यंत नवीन एजन्सी प्रत्यक्ष काम सुरू करत नाही, तोपर्यंत HSRP नसलेल्या वाहनांवर दंड किंवा इतर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत सरकारकडून चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र सध्या ही तात्पुरती सवलत किती काळासाठी असेल, याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.
 
याआधी लागू असलेल्या नियमांनुसार, ऑनलाइन नोंदणी करूनही नंबर प्लेट न बसवणाऱ्यांना १ हजार रुपये दंड, तर कोणतीही प्रक्रिया सुरू न करणाऱ्या वाहनधारकांना १० हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद होती. मात्र प्रत्यक्ष कारवाईबाबत स्पष्ट निर्णय न झाल्याने सध्या ही दंडात्मक कारवाई स्थगित ठेवण्यात आली आहे.
 
राज्यात सध्या सुमारे २ कोटी १० लाख जुनी वाहने असून, त्यापैकी ९७ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात केवळ ७५ लाख वाहनांवरच HSRP बसवण्यात आली असून, अजूनही मोठ्या प्रमाणात वाहने नवीन नंबर प्लेटच्या प्रतीक्षेत आहेत.
 
HSRP संदर्भातील अंतिम धोरणाबाबत निर्णय होणे बाकी असले, तरी ज्यांनी आधीच ऑनलाइन बुकिंग केले आहे, त्यांनी दिलेल्या तारखेप्रमाणे आणि वेळेनुसार संबंधित फिटमेंट सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन आयुक्तांनी वाहनधारकांना केले आहे.