Image Source:(Internet)
नवी दिल्ली/जयपूर :
काँग्रेसच्या महासचिव व खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा साखरपुडा नुकताच पार पडला असून, त्याने आपल्या आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात केली आहे. रेहानचा अविवा बेग हिच्याशी 29 डिसेंबर 2025 रोजी साखरपुडा झाला असून, या खास क्षणाचा पहिला फोटो आता सोशल मीडियावर समोर आला आहे.
रेहानने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर प्रियांका गांधी यांनीही रेहान आणि अविवाचा एकत्र फोटो शेअर करत भावनिक शुभेच्छा दिल्या.
“तुम्हा दोघांना खूप प्रेम. तीन वर्षांचे असल्यापासून जसे चांगले मित्र राहिलात, तसेच नेहमी एकमेकांचा आदर करत सोबत राहा,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या पोस्टवर काही तासांतच लाखो लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला असून, सोशल मीडियावर रेहान–अविवा जोडीची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
“माझा मुलगा आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. दोघांनाही प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरलेलं आयुष्य लाभो, हीच मनापासून इच्छा,” अशा शब्दांत त्यांनी मुलगा आणि होणाऱ्या सूनबाईंना आशीर्वाद दिले.
दोन्ही कुटुंबांच्या संमतीनंतर राजस्थानमध्ये हा साखरपुडा पार पडला. रेहान आणि अविवाच्या नात्याबाबत कुटुंबीयांकडून पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्याने हा सोहळा अधिक चर्चेत आला आहे.
7 वर्षांची मैत्री, प्रेमात रूपांतर
रेहान वाड्रा आणि अविवा बेग हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात असून, फोटोग्राफीची आवड हे त्यांच्यातील समान दुवे आहेत. काही काळापूर्वी रेहानने अविवाला लग्नासाठी मागणी घातली आणि तिने होकार दिला.
अलीकडेच हे जोडपं सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात एकत्र फिरताना दिसलं होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते.
रेहान वाड्राने देहरादूनमधील प्रसिद्ध दून स्कूलमधून शिक्षण घेतले असून, याच शाळेत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि राहुल गांधी यांनीही शिक्षण घेतले आहे. त्यानंतर रेहानने लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले.
राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही या साखरपुड्याची जोरदार चर्चा होत असून, रेहान–अविवा जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.