Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) सध्या अभिनय वा चित्रपटांपेक्षा तिच्या यूट्यूब व्लॉगिंगमुळे अधिक चर्चेत आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलवर फराह खानने अनोखी संकल्पना राबवली असून, तिचा स्वयंपाकी ‘दिलीप’सोबत ती थेट सेलिब्रिटींच्या घरी जाऊन स्वयंपाक करते. या व्लॉग्सना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून, दिलीपचीही स्वतंत्र फॅन फॉलोइंग तयार झाली आहे.
मनिष मल्होत्रा, बोनी कपूर, जॅकी श्रॉफ, रवीना टंडन, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, अनन्या पांडे यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या घरी दिलीपने स्वयंपाक केल्यानंतर आता फराह खान थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी पोहोचली. या भेटीचा संपूर्ण व्लॉग अजून प्रदर्शित व्हायचा असला, तरी त्याची झलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
गडकरी यांच्या घरी दिलीपने अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीचे वडे तयार केल्याचे सांगितले जाते. या भेटीदरम्यान दिलीपने आपल्या गावातील रस्त्याचा विषय काढत गडकरी यांच्याकडे गंमतीशीर शैलीत मागणीही केली. यावेळी गडकरी यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. शासकीय निवासस्थानातील स्वयंपाकघर आणि घराची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
या भेटीत नितीन गडकरी यांनी आपल्या दिनचर्येबाबत केलेले वक्तव्य विशेष ठरले. आपण रात्री 9.30 वाजता झोपतो आणि सकाळी 7 वाजता उठून नियमित व्यायाम करतो, असे त्यांनी फराह खानला सांगितले. तसेच 135 किलो वजन कमी करून 89 किलोपर्यंत आणल्याची माहितीही त्यांनी दिली. गडकरींची ही शिस्तबद्ध जीवनशैली ऐकून फराह खान चांगलीच आश्चर्यचकित झाली.
दरम्यान, दिलीपने आपले गाव बिहारमध्ये असल्याचे सांगताच, गडकरी यांनी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधल्याचा उल्लेख केला. दिलीपने गावातील छोट्या रस्त्याचा विषय काढल्यावर, “मी मोठे महामार्ग बनवतो,” असे उत्तर देत गडकरी यांनी हलक्याफुलक्या शैलीत संवाद साधला.
मनोरंजन, स्वयंपाक आणि राजकारण यांचा अनोखा संगम असलेला हा व्लॉग प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला असून, पूर्ण व्लॉगची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.