अजित पवारांच्या निधनाने सासरवाडी असलेल्या धाराशिवमध्ये कडकडीत बंद पाळला

    28-Jan-2026
Total Views |
 
Dharashiv Shutdown
 Image Source:(Internet)
धाराशिव:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, त्याचे तीव्र पडसाद धाराशिव जिल्ह्यात उमटले आहेत. धाराशिव तालुक्यातील तेर हे अजित पवार यांचे सासरगाव असून, त्यांच्या स्मरणार्थ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
 
तेर गावातील ग्रामस्थ अजित पवार यांना ‘जावई’ म्हणून विशेष आपुलकीने ओळखत होते. गावाशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. विविध कौटुंबिक कार्यक्रमांसाठी ते वेळोवेळी तेर येथे येत असत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण गाव शोकात बुडाले.
 
ग्रामस्थांनी गावात ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर बॅनर लावले असून, शोकसभा आयोजित करून अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी अजित पवार यांची आठवण काढताना त्यांना कर्तव्यदक्ष, सकाळपासून कामात झोकून देणारे आणि दिलेल्या शब्दाला जागणारे नेतृत्व म्हणून गौरवले.
 
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याची भावना तेर गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.