‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचा गौरव; दिल्लीतील कर्तव्य पथावर ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

    26-Jan-2026
Total Views |
 
Republic Day
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
राजधानीतील कर्तव्य पथावर सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यंदाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या गौरवाला समर्पित ही संकल्पना होती. स्वातंत्र्यलढ्यात जनतेला प्रेरणा देणाऱ्या या गीताच्या ऐतिहासिक वाटचालीला विशेष महत्त्व देण्यात आले.
 
राष्ट्रपती भवन ते राष्ट्रीय युद्ध स्मारक दरम्यानचा संपूर्ण कर्तव्य पथ रोषणाई, फुलांची सजावट आणि रंगीबेरंगी मांडणीने खुलून दिसत होता. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त एक वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमांची सुरुवात ७ नोव्हेंबर २०२५ रोजी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
 
या भव्य संचलनात एकूण ३० चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे, तसेच १३ केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ होते. ‘वंदे मातरम्’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांवर आधारित चित्ररथांनी देशाच्या विकासाचा प्रवास उलगडून दाखवला.
 
चित्ररथांमधून भारताची औद्योगिक, संरक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील प्रगती प्रभावीपणे सादर करण्यात आली. विविध राज्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांतून देशातील बहुरंगी परंपरा आणि राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडले. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा देशभक्ती, एकात्मता आणि प्रगत भारताचा संदेश देणारा ठरला.