चंद्रपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला; धानोरकर–वडेट्टीवार गट आमनेसामने

    24-Jan-2026
Total Views |
-१३ नगरसेवकांची स्वतंत्र नोंदणी

Dhanorkar vs WadettiwarImage Source:(Internet) 
चंद्रपूर :
चंद्रपूर (Chandrapur) महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर आले असून गटबाजी तीव्र झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या २७ नगरसेवकांपैकी १३ जणांना सोबत घेत नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
 
या घडामोडीची माहिती मिळताच काँग्रेस विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी तत्काळ विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेत या नोंदणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत, या गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी वडेट्टीवार समर्थकांकडून करण्यात आली. परिणामी, दोन्ही गटांच्या परस्पर दाव्यांवर विभागीय आयुक्त मंगळवारी निर्णय देणार आहेत.
 
दरम्यान, शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या राजकीय हालचालींनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिकच ठळक झाले. नागपुरात दाखल झालेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा करत गटनेत्याचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे संकेत दिले होते. मात्र गटनेतापदावर सहमती न झाल्याने निर्णय रखडला.
 
वडेट्टीवार गटाकडून वसंता देशमुख यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, तर धानोरकर गटाने सुरेंद्र अडबाले यांचे नाव पुढे केले. मात्र दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या प्रस्तावांना नकार दिल्याने तणाव वाढला. अखेर संध्याकाळी प्रतिभा धानोरकर यांनी १३ नगरसेवकांसह थेट विभागीय आयुक्त कार्यालय गाठून स्वतंत्र काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी केली.
 
बहुमत-अल्पमतावर वाद धानोरकर गटाने आपण प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशानुसारच गट स्थापन केल्याचा दावा केला असून, २७ नगरसेवकांच्या नावांचे पत्र व गटनेता म्हणून सुरेंद्र अडबाले यांचे नाव सादर केले आहे. मात्र वडेट्टीवार गटाने या गटाला तीव्र विरोध करत, १३ नगरसेवकांचा गट अल्पमतात असल्याने त्याला मान्यता देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी १४ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे.
 
महानगरपालिकेतील सध्याचे संख्याबळ चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण ६६ नगरसेवक असून राजकीय गणित पुढीलप्रमाणे आहे – भाजप २३, काँग्रेस २७, काँग्रेस समर्थित जनविकास सेना ३, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ६, वंचित बहुजन आघाडी २, बसपा १, शिवसेना (शिंदे गट) १, अपक्ष २ आणि एमआयएम १.
 
काँग्रेसमधील या अंतर्गत कलहाचा राजकीय फायदा भाजप उचलू शकते, अशी चर्चा सुरू असून आता सर्वांचे लक्ष विभागीय आयुक्तांच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.