Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी कडाडून टीका केली आहे. कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली आणि नियमांनुसार पार पडलेल्या प्रक्रियेवर संशय घेणे म्हणजे लोकशाहीवरच अविश्वास दाखवण्यासारखे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सर्व महापौरपदांच्या आरक्षण सोडती पूर्णपणे पारदर्शक होत्या. हस्तक्षेपाची कोणतीही शक्यता नसताना ‘फिक्सिंग’चे आरोप करणे ही राजकीय अस्वस्थतेची प्रतिक्रिया आहे. निकाल आपल्या बाजूने लागले नाहीत की अशा प्रकारचे आरोप केले जातात, असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक निकाल प्रतिकूल ठरले की ईव्हीएमवर बोट दाखवले जाते आणि निकाल अनुकूल लागला की त्याच यंत्रणांबाबत मौन पाळले जाते, असेही ते म्हणाले.
नागपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गातून महिला आरक्षण जाहीर झाल्याने शहराला महिला नेतृत्व मिळणार असल्याचा उल्लेख करत बावनकुळे यांनी ही बाब स्वागतार्ह असल्याचे सांगितले. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महिलांना नेतृत्वाची संधी मिळणे हे सकारात्मक परिवर्तन असल्याचेही त्यांनी नमूद केले.