महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळांना ईडीकडून दिलासा; सर्व आरोपांतून मुक्तता

    23-Jan-2026
Total Views |
 
Chhagan Bhujbal
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या (Maharashtra Sadan) कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भुजबळ यांना निर्दोष ठरवत या प्रकरणातून मुक्त केले आहे. याआधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) त्यांना क्लिनचिट देण्यात आली होती.
 
महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळ यांच्यासह इतर आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला होता. तपासाअंती ईडीने हा अर्ज मंजूर करत भुजबळ यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादग्रस्त प्रकरणाचा शेवट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
 
दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या कथित घोटाळ्याची रक्कम सुमारे ८५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणात एकूण १४ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. या आरोपांमुळे छगन भुजबळ यांना जवळपास दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला होता.
 
मात्र, सखोल तपासानंतर भुजबळ यांचा थेट सहभाग सिद्ध न झाल्याने प्रथम एसीबी आणि आता ईडीकडूनही त्यांना दिलासा देण्यात आला आहे. ईडीच्या या निर्णयामुळे भुजबळ यांच्यावरील कायदेशीर अडचणी दूर झाल्या असून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठा वादग्रस्त अध्याय संपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.