अंतराळ क्षेत्रातील सुवर्णअध्यायाचा शेवट; 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सुनीता विल्यम्स यांचा संन्यास!

    21-Jan-2026
Total Views |
 
Williams retires
 Image Source:(Internet)
केप केनरव्हल (अमेरिका):
भारतीय वंशाच्या ज्येष्ठ नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी अधिकृतपणे संन्यास स्वीकारत आपल्या गौरवशाली कारकिर्दीचा शेवट केला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अनपेक्षित परिस्थितीमुळे अनेक महिने अडकून राहिलेल्या अंतराळवीरांमध्ये त्या होत्या.
 
नासाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीपासून प्रभावी ठरली आहे. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाच्या चाचणी मोहिमेदरम्यान त्यांच्यासोबत अडकलेले सह-अंतराळवीर बुच विलमोर यांनी यापूर्वीच, गेल्या उन्हाळ्यात नासातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
 
2024 मध्ये विल्यम्स आणि विलमोर यांना ISS वर पाठवण्यात आले होते. मात्र, स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे फक्त आठवडाभराचे नियोजित मिशन तब्बल नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ लांबले. अखेर मागील वर्षी मार्चमध्ये दोघेही सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
 
60 वर्षीय सुनीता विल्यम्स या अमेरिकन नौसेनेतील माजी कॅप्टन असून त्यांनी नासामध्ये 27 वर्षांहून अधिक काळ महत्त्वाची भूमिका बजावली. तीन अंतराळ मोहिमांमध्ये त्यांनी एकूण 608 दिवस अंतराळात वास्तव्य केले. महिलांमध्ये सर्वाधिक काळ स्पेसवॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून त्यांनी 62 तासांपेक्षा अधिक वेळ अंतराळात चहलकदमी केली आहे.
 
नासाचे नवे प्रशासक जॅरेड आयझॅकमन यांनी सुनीता विल्यम्स यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “अंतराळ उड्डाण क्षेत्रातील दिशादर्शक व्यक्तिमत्त्व” असे संबोधले आणि त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 
दरम्यान, बोईंगकडून पुढील स्टारलाइनर मोहिम मानवी अंतराळवीरांशिवाय पार पाडली जाणार असून ती केवळ मालवाहतुकीपुरती मर्यादित असेल. सर्व तांत्रिक त्रुटी पूर्णतः दूर झाल्यानंतरच मानवी उड्डाणास परवानगी दिली जाईल, असे नासाने स्पष्ट केले आहे.
 
सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या हे नामवंत न्यूरोलॉजिस्ट असून ते मूळचे गुजरातचे होते. तर त्यांची आई उर्सुलिन बोनी पांड्या या स्लोव्हेनियन-अमेरिकन पार्श्वभूमीच्या होत्या.