Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या हालचाली तीव्र होत असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मोठा राजकीय धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने (MNS) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या असून, स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकारास येत आहे.
महापालिकेतील सत्तेसाठी ६२ नगरसेवकांची आवश्यकता असताना, शिंदे गटाकडे सध्या ५३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. भाजपकडे ५० नगरसेवक असून ठाकरे गट आणि मनसे निर्णायक ठरण्याच्या भूमिकेत होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटातील नगरसेवकांमध्ये फूट पडत गेल्याने पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या घटली आहे.
निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे काही नगरसेवक संपर्काबाहेर गेले. यातील दोघे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती, तर आणखी दोन नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची माहिती समोर आली. परिणामी ठाकरे गटाचे संख्याबळ ११ वरून ७ वर घसरले.
दरम्यान, निवडणुकीत शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने आता थेट शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय चित्रच पालटले आहे. मनसेचे पाच नगरसेवक आणि मनसेत गेलेले दोन नगरसेवक अशा सात नगरसेवकांनी शिंदे गटाच्या सत्तास्थापनेला पाठिंबा दिला आहे.
‘विकासासाठी समर्थन’ – श्रीकांत शिंदे
“कल्याण-डोंबिवलीच्या विकासकामांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मनसेने आम्हाला साथ दिली आहे. शिवसेनेचे ५३ नगरसेवक घेऊन आम्ही गट नोंदणीसाठी कोकण भवन येथे आलो आहोत,” अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
महापौरपदाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “महापौर कोण होणार, याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रश्न नाही.”
ठाकरे गटाची कायदेशीर भूमिका-
दरम्यान, गट नोंदणीवेळी अनुपस्थित राहिलेल्या ठाकरे गटातील चार नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे नगरसेवक निर्णायक टप्प्यावर गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाकडून कायदेशीर पर्यायांचा विचार केला जात आहे.
केडीएमसी निवडणूक निकाल (१२२ जागा)-
शिंदे गट शिवसेना : ५३
भाजप : ५०
ठाकरे गट शिवसेना : ११
मनसे : ५
काँग्रेस : २
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : १
मनसेच्या भूमिकेमुळे कल्याण-डोंबिवलीतील सत्ता कोणाच्या हातात जाणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले असून, पुढील निर्णयांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.