शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ सुरू? ठाकरे गटाचे नगरसेवक संपर्कात; भाजपला डावलून शिवसेनेचा महापौर होणार का?

    20-Jan-2026
Total Views |
 
Eknath Shinde
 Image Source:(Internet)
 
कल्याण–डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेचे गणित दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून महापौरपद मिळवण्यासाठी हालचालींना वेग आला असून, ‘ऑपरेशन टायगर’(Operation Tiger)ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
 
शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची घेतलेली भेट या चर्चांना अधिक बळ देणारी ठरली आहे. या भेटीनंतर ठाकरे गटाचे तब्बल ९ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येत भाजपला बाजूला ठेवून कल्याण–डोंबिवलीत शिवसेनेचाच महापौर बसणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
 
दरम्यान, कल्याण–डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, गट नोंदणीसाठी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये केवळ ९ नगरसेवकच हजर राहिले. उर्वरित दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ठाकरे गटाने निवडून आलेल्या नगरसेवकांना काही काळ अज्ञातवासात ठेवले होते. मात्र, मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली. जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दोघांच्याही घरी जाऊन नोटीस बजावत गट स्थापनेच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास पक्षविरोधी कारवाईचा इशारा दिला होता. ही नोटीस मधुर म्हात्रे यांचे वडील आणि किर्ती ढोणे यांच्या बहिणीला देण्यात आली होती. तरीही हे दोन्ही नगरसेवक बैठकीला हजर राहिले नाहीत.
 
भाजप–शिवसेनेत रस्सीखेच तीव्र-
कल्याण–डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ५३ तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. सत्तास्थापनेसाठी ६२ नगरसेवकांचा आकडा आवश्यक असल्याने ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक ‘किंगमेकर’ ठरणार आहेत.
 
मनसेसोबत युती करून सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महायुतीचाच महापौर होणार, मात्र पहिली अडीच वर्षे महापौरपद भाजपलाच मिळावे, अशी ठाम मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. तसेच मनसे आणि ठाकरे गटातील काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
 
एकूणच, कल्याण–डोंबिवलीतील महापौरपदासाठी राजकीय हालचाली शिगेला पोहोचल्या असून, अंतिम सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.