Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
भारतीय बॅडमिंटनला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळवून देणारी ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने आपल्या कारकिर्दीला अधिकृत पूर्णविराम दिला आहे. सततच्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे आता सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक खेळ शक्य नसल्याने तिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दुखापतीने थांबवला ‘चॅम्पियन’चा प्रवास-
सायनाच्या गुडघ्यातील कार्टिलेज झिजणे तसेच आर्थरायटिसचा त्रास गेल्या काही वर्षांत वाढत गेला. यामुळे कठोर सराव आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये खेळणे अशक्य झाले. याच पार्श्वभूमीवर एका पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने आपल्या संन्यासाचा खुलासा केला.
ती म्हणाली की, गेल्या दोन वर्षांपासून ती प्रत्यक्षात स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर होती. मात्र, आता आपल्या कारकिर्दीच्या समाप्तीवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय तिने घेतला.
शिखरावर असताना थांबणे महत्त्वाचे-
संन्यासाविषयी बोलताना सायना म्हणाली,
“जेव्हा तुम्ही सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करू शकत नाही, तेव्हा स्वतःला थांबवण्याची हिंमत ठेवावी लागते. मी खेळात स्वतःच्या अटींवर आले आणि आता त्याच अटींवर बाहेर पडतेय.”
रिओ ऑलिम्पिकनंतर संघर्षाची सुरुवात-
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या दुखापतीनंतर सायनाचा संघर्ष अधिक तीव्र झाला. अनेकदा पुनरागमनाचे प्रयत्न करूनही दुखापतीने तिची पाठ सोडली नाही. मात्र, या कठीण काळातही सायनाने हार मानली नाही.
दुखापतीशी झुंज देत तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी पदके पटकावली. हा तिच्या जिद्दीचा आणि राष्ट्रासाठी खेळण्याच्या वृत्तीचा ठसा मानला जातो.
प्रेरणादायी वारसा-
सायना नेहवालचा संन्यास हा केवळ एका खेळाडूचा निवृत्तीघोष नसून, भारतीय बॅडमिंटनच्या एका प्रेरणादायी अध्यायाचा शेवट आहे. तिच्या संघर्षमय, यशस्वी आणि ऐतिहासिक कारकिर्दीने पुढील पिढीतील खेळाडूंना नवी दिशा आणि आत्मविश्वास दिला आहे.