मुंबई मनपाचा महापौर उद्धव ठाकरेंचाच? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निकालामुळे राजकीय गणिते बदलणार का?

    20-Jan-2026
Total Views |
 
Uddhav Thackeray
 Image Source:(Internet)
मुंबई:
मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महापौरपद शिंदे गटाकडे जाणार की भाजप पहिल्यांदाच मुंबईचा महापौर करणार, यावरून महायुतीतच जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे वकील ॲड. असीम सरोदे यांच्या एका ट्विटने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडवली आहे.
 
महापौर निवडणुकीआधी संभाव्य फोडाफोडी- टाळण्यासाठी शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना थेट ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये ठेवल्याची चर्चा आहे. तेथून नगरसेवकांना कोकण भवनात नेण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असल्याने महापौरपदाबाबत अंतिम निर्णय लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.
 
भाजप-शिंदेसेना यांच्यात महापौरपदावर पेच-
राज्यात आणि मुंबईत भाजपचा झंझावात दिसून आला असून मुंबई महापालिकेत भाजप बहुमताच्या अगदी जवळ पोहोचला आहे. भाजपकडे 89 नगरसेवक असून बहुमतासाठी 114 चा ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी शिंदेसेनेच्या 29 नगरसेवकांची नितांत गरज आहे. त्यामुळे शिंदेसेना या टप्प्यावर ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे.
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महापौरपद शिंदे गटासाठी सोडावे, अशी आग्रही मागणी शिंदेसेनेकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपलाही इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबईचा महापौर करण्याची संधी मिळत असल्याने तडजोडीबाबत साशंकता आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महायुतीतील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि ‘तो’ ट्विट-
याच दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर उद्या सुनावणी आहे. मात्र, हे प्रकरण क्रमांक 37 वर असल्याने तातडीने सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
 
याच ट्विटमध्ये ॲड. सरोदे यांनी “मुंबईचा महापौर उद्धव ठाकरेंचाच होऊ शकतो,” असा खळबळजनक दावा केला आहे. या विधानामुळे राजकीय समीकरणे बदलतील का, आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा थेट परिणाम महापालिकेच्या सत्तास्थापनेवर होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर मुंबई?
महापौरपदावरून भाजप आणि शिंदेसेनेत सुरू असलेल्या तणावात आता उद्धव ठाकरे गटाने अप्रत्यक्षपणे दावा केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. सर्वोच्च न्यायालयातील पुढील घडामोडी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या परतीनंतर होणाऱ्या चर्चा यावरच आता मुंबई महापालिकेच्या सत्तेचे भविष्य ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.