Image Source:(Internet)
कॉर्डोबा (स्पेन):
दक्षिण स्पेनमध्ये (Spain) रविवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. कॉर्डोबा प्रांतातील अदामुझ परिसरात दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक होऊन किमान 21 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मालागाहून माद्रिदकडे जाणारी हाय-स्पीड ट्रेन अचानक रुळावरून घसरली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या माद्रिदहून हुएल्वाकडे जाणाऱ्या दुसऱ्या हाय-स्पीड ट्रेनशी तिची भीषण धडक झाली. दोन्ही ट्रेनमध्ये मिळून सुमारे 500 प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्पॅनिश रेल्वे ऑपरेटर एडीआयएफ (ADIF) ने दिलेल्या माहितीनुसार, धडकेनंतर अनेक डबे एकमेकांवर आदळले तर काही डबे पूर्णपणे उलटले. सिव्हिल गार्डच्या माहितीनुसार, अद्यापही काही प्रवासी डब्यांमध्ये अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि रेड क्रॉसच्या पथकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. जखमी प्रवाशांना माद्रिदसह आसपासच्या सहा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने माद्रिदमधील रुग्णालयांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
या दुर्घटनेनंतर माद्रिद आणि अंडालुसिया दरम्यानची सर्व हाय-स्पीड रेल्वे सेवा तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील काही गाड्या त्यांच्या मूळ स्थानकांकडे परत पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तांत्रिक बिघाड की मानवी चूक, याचा सखोल तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेबद्दल संपूर्ण स्पेनमध्ये शोक व्यक्त करण्यात येत असून, सरकारने मदत व बचावकार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.