- गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांच्या भूमिकेवर भर
नागपूर :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या नागपूर दौऱ्यातून देशाच्या संरक्षण धोरणांबाबत महत्त्वाचा संदेश देण्यात आला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडच्या नव्या दारुगोळा उत्पादन केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, सध्याच्या काळात युद्धाची संकल्पना पूर्णपणे बदलली आहे. आजचे संघर्ष केवळ सीमांवर किंवा रणांगणावर लढले जात नाहीत, तर ऊर्जा, व्यापार, पुरवठा साखळी, तंत्रज्ञान आणि माहितीच्या माध्यमातूनही देशांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे संरक्षण व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना सिंह म्हणाले की, पूर्वी हे क्षेत्र केवळ सरकारी उद्योगांपुरते मर्यादित होते. खासगी कंपन्या या क्षेत्रात सक्षम योगदान देऊ शकतील, असा विश्वास तेव्हा नव्हता. मात्र खासगी क्षेत्राकडे कौशल्य, संशोधन क्षमता आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन असूनही त्यांना पुरेशा संधी मिळाल्या नव्हत्या.
आत्मनिर्भर भारत धोरणानंतर संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांना सहभागी करून घेतले गेले. सुरुवातीला या निर्णयावर शंका व्यक्त करण्यात आल्या, मात्र सरकारने धोरणात्मक बदल करत खासगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसत असून खासगी क्षेत्रातून दर्जेदार आणि आधुनिक संरक्षण साहित्य वेळेत तयार होत असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.
या वेळी सोलर समूहाने विकसित केलेल्या मार्गदर्शित पिनाका रॉकेट्सच्या पहिल्या तुकडीला आर्मेनियासाठी रवाना करण्यात आले. तसेच येत्या तीन महिन्यांत २३ मिमी दारुगोळ्याच्या चाचणीसाठी स्वतंत्र चाचणी रेंज सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सीमाभागांवर नजर ठेवण्यासाठी आणि लढाऊ कारवायांसाठी अत्याधुनिक ड्रोन विकसित करण्याचे नियोजनही कंपनीकडून जाहीर करण्यात आले.