Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले असून, त्यात महायुतीने मोठं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. २९ पैकी तब्बल २१ महानगरपालिकांवर भाजपसह महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेस राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, मित्रपक्षांच्या मदतीने तीन महानगरपालिकांवर तिने सत्ता मिळवली आहे. मात्र, या निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसला असून, एकाही महानगरपालिकेवर एकहाती विजय मिळवता आलेला नाही.
महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्यात ठाण मांडून होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. यासाठी शरद पवार गटासोबतही युती करण्यात आली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवारांना मोठा राजकीय धक्का बसल्याचं चित्र आहे.
निकालाच्या दिवशी अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दूर राहिले. काही पत्रकारांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणतंही उत्तर न देता निघून जाणं पसंत केलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा निराशेचा भाव पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पराभव किती जिव्हारी लागला आहे, हे स्पष्टपणे दर्शवत होता.
महापालिकेच्या निकालानंतर अजित पवारांनी राजकीय हालचालींना वेग दिला असून, ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीतील गोविंद बागेत ते शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीसाठी शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपेही त्यांच्यासोबत आहेत. पराभवानंतर लगेचच अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
या भेटीमागे अजित पवार राज्याच्या राजकारणात एखादा मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याचंही बोललं जात आहे. सध्या पवार काका-पुतण्यांच्या या भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्यात असलं, तरी महापालिकेतील पराभवानंतर झालेल्या या अचानक भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.