ठाण्यात सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता; शिंदे गटाला अनपेक्षित धक्का!

    16-Jan-2026
Total Views |
 
Thane
 Image Source:(Internet)
ठाणे :
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीचे प्राथमिक कल समोर येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे (Thane) महानगरपालिकेतून समोर येणारे चित्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेचे ठरत आहे. २०१७ प्रमाणेच यंदाही ठाणे महापालिकेत एकूण ३३ प्रभाग असून, ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राजकीय गणिते बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
 
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी सुरुवातीच्या कलांनुसार शिंदे गटाची शिवसेना २५ जागांवर आघाडीवर आहे. भाजप १० जागांवर पुढे असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ७ जागांवर आघाडी घेत आश्चर्यकारक कामगिरी करताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या आकड्यांमुळे ठाणे महापालिकेतील सत्तासमीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
 
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी शिवसेनेने ६७ जागा जिंकत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती, तर भाजप २३ जागांवर तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्या तुलनेत यंदा शिवसेनेची पकड ढासळत असल्याचे चित्र समोर येत आहे.
 
ठाणे महापालिकेच्या निकालावर एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा अवलंबून असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत शिवसेनेत फूट पडली असली, तरी बहुतांश माजी नगरसेवक शिंदे गटासोबत असल्यामुळे त्यांना मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मतमोजणीतील प्राथमिक कल त्या अपेक्षांना धक्का देताना दिसत आहेत.
 
गेल्या ३० वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वकाळापासून ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. केवळ १९८७ ते १९९३ या कालावधीत ठाणे महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे यंदा ठाण्यात सत्ता कायम राहणार की बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी आक्रमक प्रचार केला होता. दुचाकी रॅली काढत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. विकासकामांचा उल्लेख करत भविष्यातही पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते आणि आरोग्य क्षेत्रात वेगाने काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.
 
मात्र, सध्याच्या कलांमुळे ठाणे महापालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबतची उत्सुकता वाढली असून अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.