मनपा निवडणूक टक्केवारी;नागपुरात 41.23% मतदान,मुंबईतही कमी प्रतिसाद, कोल्हापूर आघाडीवर!

    16-Jan-2026
Total Views |
 
Municipal Election
 Image Source:(Internet)
नागपूर:
राज्यात 9 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घेण्यात आलेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी (Municipal Election) आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी हळूहळू हजेरी लावण्यास सुरुवात केली. नागपूर महानगरपालिकेत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.23 टक्के मतदानाची नोंद झाली असून, शहरात मतदानाचा प्रतिसाद मध्यम स्वरूपाचा राहिला.
 
नागपूरमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार तसेच पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव्या मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. काही ठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात गर्दी वाढली, मात्र दिवसभराचा विचार करता अपेक्षित मतदानाचा आकडा गाठता आला नसल्याचे चित्र आहे.
 
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.08 टक्के मतदान झाले. कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 227 मध्ये केवळ 15.73 टक्के मतदानाची नोंद झाल्याने कमी मतदानाची चर्चा सुरू आहे. पुण्यातही मतदानाचा कल कमी राहिला असून, पुणे महापालिकेत 36.95 टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 40.50 टक्के मतदान झाले आहे.
 
राज्यातील इतर महापालिकांमध्ये कोल्हापूरने सर्वाधिक मतदानाची नोंद केली असून येथे 50.85 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय परभणी (49.16 टक्के), अहिल्यानगर (48.49 टक्के) आणि इचलकरंजी (46.23 टक्के) या शहरांमध्येही तुलनेने चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
 
सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार असून, त्यानंतर अंतिम मतदान टक्केवारी स्पष्ट होणार आहे. मात्र, एकूणच 9 वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभर मतदानाचा उत्साह अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे स्पष्ट होत आहे.