अमरावतीत भाजपला जबरदस्त झटका; अटीतटीच्या लढतीत फडणवीसांचे मामेभाऊ पराभूत

    16-Jan-2026
Total Views |
 
BJP Fadnavis
 Image Source:(Internet)
अमरावती :
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) झालेल्या मतदानानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी चार वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र, निकाल येण्याआधीच अमरावतीत भाजपला (BJP) मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
 
अमरावती महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १४ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांना काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी अटीतटीच्या लढतीत पराभूत केले आहे. या निकालामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
अमरावती महापालिकेच्या ८७ जागांसाठी मतदान शांततेत पार पडले होते. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत दिसून आली, तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार पिछाडीवर होते. मात्र, दुपारनंतर निकालाचे चित्र बदलले आणि अखेर काँग्रेसचे संजय शिरभाते यांनी बाजी मारली.
 
दरम्यान, विवेक कलोती यांच्या पराभवासाठी युवा स्वाभिमान पक्ष जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रचाराच्या ऐन धामधुमीत आमदार रवी राणा यांच्या पक्षाने भाजपची साथ सोडल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
विवेक कलोती यांचा पराभव विशेष चर्चेचा ठरत आहे. कारण २०१८ मध्ये अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्या वेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असल्यानेच त्यांना हे पद मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, सध्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
दरम्यान, या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले की, “विवेक कलोती यांचा पराभव भाजपसाठी नक्कीच धक्का देणारा आहे. मात्र, आम्ही जनतेच्या कौलाचा पूर्ण आदर करतो. विवेक कलोती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असले, तरी प्रभागातील मतदारांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. भाजप नेहमीच जनमताचा सन्मान करत आली आहे.