रामटेक तहसीलमध्ये धक्कादायक प्रकार; ‘मृत’ ठरवलेली १०३ वर्षीय आजी अचानक झाली जिवंत!

    15-Jan-2026
Total Views |
 
Ramtek dead 103-year-old women
 Image Source:(Internet)
रामटेक :
रामटेक (Ramtek) तहसीलमध्ये घडलेल्या एका अविश्वसनीय घटनेने सर्वांनाच चकित केले आहे. मृत घोषित करण्यात आलेल्या १०३ वर्षीय वृद्ध महिलेला काही तासांतच श्वास येऊ लागल्याने अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यानच एकच खळबळ उडाली. हा प्रकार सध्या संपूर्ण जिल्ह्यात कुतूहल आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
 
चारगाव (ता. रामटेक) येथील मूळ रहिवासी गंगाबाई सावजी साखरे (वय १०३) या सध्या आंबेडकर वॉर्डमधील आपल्या मुलीच्या घरी राहत होत्या. १२ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नसल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी, १३ जानेवारी रोजी, अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. घरासमोर पंडाल उभारण्यात आला होता, तर विधीसाठी लागणारे साहित्यही आधीच आणण्यात आले होते.
 
मात्र, संध्याकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास अचानक गंगाबाई यांच्या शरीरात हालचाल जाणवली. काही क्षणांतच त्यांनी श्वास घेण्यास सुरुवात केल्याने उपस्थित सर्वजण अवाक् झाले. मृत समजल्या गेलेल्या गंगाबाई पुन्हा जिवंत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांसह शेजारीपाजारी भावूक झाले.
 
यानंतर गंगाबाईंशी संवाद साधण्यात आला असता त्यांनी हसतच, “मी देवाकडे थोडी सुट्टी घेऊन गेले होते,” असे उत्तर दिल्याने वातावरण अधिकच भावूक झाले. या अनपेक्षित घटनेनंतर परिसरात आनंदाचे आणि आश्चर्याचे वातावरण असून अनेक नागरिक या प्रकाराकडे चमत्कार म्हणून पाहत आहेत. रामटेक तहसीलसह जिल्हाभरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.