नागपूर मनपा निवडणूक: सरसंघचालकांनी बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांनाही केले आवाहन!

    15-Jan-2026
Total Views |
 
Mohan Bhagwat
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत लोकशाही प्रक्रियेत नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
 
निवडणूक ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य असल्याचे भागवत यांनी सांगितले. जनहिताचा विचार करून योग्य उमेदवाराला मत देणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सर्वांनी घराबाहेर पडून प्रथम मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगासह विविध यंत्रणांकडून सातत्याने जनजागृती केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. मतदानानंतर जो निकाल लागेल, तो लोकशाही व्यवस्थेचा भाग असून तो स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 
‘नोटा’बाबत बोलताना भागवत म्हणाले की, सर्व उमेदवारांना नकार देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे अयोग्य पर्यायाला संधी देण्यासारखे ठरू शकते. ‘नोटा’ हा नाराजीचा पर्याय असला तरी, देशाच्या कारभारासाठी “कोणीच नाही” ही अवस्था अधिक घातक आहे. राजा नसणे म्हणजे अराजक, आणि अराजक हीच सर्वात वाईट परिस्थिती असल्याचे उदाहरण त्यांनी पितामह भीष्मांच्या संदर्भातून स्पष्ट केले.
 
दरम्यान, राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, नागपूरसह एकूण २८६९ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत १५ हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत.