Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यभरात आज महापालिका निवडणुकांसाठी (Election) मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मतदानादरम्यान काही मतदान केंद्रांवरील मतदारांनी बोटाला लावलेली शाई काही मिनिटांत पुसली जात असल्याचा आरोप केल्याने राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात २०११ पासून मार्कर पेनचा वापर करण्यात येत आहे. ही शाई एकदा
सुकल्यानंतर पुसता येत नाही. केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जी शाई वापरते, तीच शाई सध्याच्या महापालिका निवडणुकांसाठीही वापरण्यात येत आहे. दुसरी कोणतीही शाई वापरली जात नाही.
मतदारांनी दोनदा मतदान करू नये, यासाठीच ही शाई लावली जाते. जर एखादा मतदार दुसऱ्यांदा मतदान करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, या निवडणुकांमध्ये शाईबाबत संभ्रम आणि फेक नॅरेटिव्ह पसरवले जात असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
साध्या हॅंडवॉश किंवा सॅनिटायझरनेही शाई पुसली जात असल्याच्या आरोपांवर उत्तर देताना ते म्हणाले की, हे पूर्णपणे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केले असून, त्यांच्या बोटावरील शाईही पुसली गेलेली नाही.
दुबार मतदारांच्या नावांबाबत बोलताना वाघमारे म्हणाले की, पूर्ण ओळख पटल्याशिवाय कोणालाही मतदान करू दिले जात नाही. दुबार मतदार असल्याचा संशय असल्यास त्यांना दोन ओळखपत्रे सादर करावी लागतात. संपूर्ण तपासणी केल्यानंतरच मतदानाची परवानगी दिली जाते. याशिवाय मतदान कक्षात मतदान प्रतिनिधी आणि उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यामुळे दुसऱ्यांदा मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास तो रोखला जातो.
निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत करत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना वाघमारे म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना मत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक आयोग पूर्णपणे निष्पक्षपणे काम करत आहे. आयोग कोणाच्याही बाजूने नाही. सर्व तक्रारी आणि बाबींची गांभीर्याने दखल घेतली जात आहे.”
तसेच मतदारांनी आपल्या नावाबाबत स्वतः जागरूक राहावे आणि मतदार यादीची वेळोवेळी तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.