Image Source:(Internet)
पुणे :
पुणे (Pune) महापालिकेच्या निवडणुकीत बिहारमधील चार महिलांनी बोगस मतदान केल्याचा जोरदार आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. वानवडी येथील सनग्रेस स्कूल मतदान केंद्रावर या चार महिलांनी खोटे मतदान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच जनवाडी परिसरातील वीर बाजीप्रभू विद्यालय केंद्रावरही बोगस मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईमध्येही मतदान प्रक्रियेत विविध तक्रारी आणि समस्या उभ्या राहिल्या आहेत. अंधेरी पूर्व भागातील ७५ वर्षीय दिलीप पाटील यांचे नाव वॉर्ड क्रमांक ८४ मधील मतदार यादीतून हटवल्याची त्यांनी तक्रार केली आहे. पूर्वी अनेकदा मतदान करणाऱ्या पाटील यांना यावेळी मतदानाचा अधिकार मिळाला नाही. याशिवाय अनेक ठिकाणी मतदार यादीतील नाव आणि फोटो यामध्ये विसंगती पाहायला मिळाली आहे. काही ठिकाणी मुलाचे नाव असून फोटो आईचा असण्याची बाबही समोर आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत दुबार मतदान थांबविणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरले आहे. सुरुवातीला ११ लाख १ हजार ५०५ दुबार मतदारांची नावे सापडली होती, त्यांच्यावर तंत्रज्ञान विभागाने तपासणी करून अंतिम दुबार मतदारांची यादी तयार केली आहे. अंतिम यादीमध्ये एक लाख ६८ हजार ३५० दुबार मतदारांची नावे कायम ठेवण्यात आली. महापालिका कर्मचाऱ्यांनी घराघर भेट देऊन ४८ हजार ६२८ जणांनी दुबार मतदान न करण्याचे हमीपत्र भरून दिले आहे, मात्र इतर अनेक मतदार विविध कारणांनी संपर्कात आले नाहीत.
मतदान केंद्रांवर दुबार मतदार आढळल्यास त्यांचे कागदपत्रे तपासली जातील आणि मतदानादरम्यान एकाच ठिकाणी मतदान केल्याचा हमीपत्रही घेतला जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर महापालिकेचे कर्मचारी तैनात राहणार आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत २२७ प्रभागांत १७०० हून अधिक उमेदवार आपआपल्या बाजूने लढत आहेत. निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित मतदान हा प्रशासनासाठी मोठा ध्यास असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.