Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार मंगळवारी थांबला असताना, मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पक्षासाठी मोठा हादरा मानला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यभर महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकाणी नाराजी उफाळून आली असून, तिकीट न मिळाल्याने किंवा डावलले गेल्याच्या भावनेतून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाल्याचे चित्र दिसत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्येही हेच चित्र पाहायला मिळाले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.
माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला असून, पक्षात योग्य स्थान आणि अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ते अस्वस्थ होते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे, १९८४ पासून राष्ट्रवादीशी जोडलेले असलेले रमेश कदम हे शरद पवार यांचे निष्ठावंत समर्थक मानले जात होते. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते त्यांच्या बाजूने गेले होते, मात्र त्या काळातही रमेश कदम यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती. त्यामुळे मतदानाच्या एक दिवस आधीच त्यांनी घेतलेला हा निर्णय शरद पवार गटासाठी अधिक धक्कादायक मानला जात आहे.
आता या राजीनाम्याचा महापालिका निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार, आणि यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताकदीला किती फटका बसेल, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.