Image Source:(Internet)
नागपुर :
शहरात प्रतिबंधित गुटखा (Gutkha) आणि सुगंधित तंबाखूविरोधात क्राइम ब्रँचने जोरदार कारवाई केली आहे. क्राइम ब्रँच युनिट क्रमांक ५ ने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा उघडकीस आणला. या कारवाईत सुमारे ५ लाख ४ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रेमनगर, नारायणपेठ परिसरातील एका भाड्याच्या खोलीवर छापा मारण्यात आला. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पूर्णतः बंदी घातलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
छापेमारीदरम्यान नयन केसरवाणी या व्यक्तीस घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. आरोपीने हा सर्व माल भाड्याच्या खोलीत साठवून ठेवत अवैध विक्रीसाठी तयारी केली होती, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आर्थिक फायद्यासाठी तो हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत असल्याचेही समोर आले आहे.
राज्य सरकारने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री व वाहतूक यावर बंदी घातली असतानाही अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात संबंधित कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहरात प्रतिबंधित पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.