Image Source:(Internet)
कोल्हापूर :
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून समाजाला सुन्न करणारी आणि संताप उसळवणारी घटना समोर आली आहे. एका शाळेच्या मुख्याध्यापकानेच आपल्या माजी अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत, विश्वासाचा बुरखा पांघरून आरोपीने हे अमानुष कृत्य केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोक्सो कायद्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा ज्ञानू दाभोळे असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असून ती दहावीपर्यंत याच शाळेत शिक्षण घेत होती. तिची आई सध्या कोल्हापूर शहरात वास्तव्यास असून काही दिवसांपासून आजारी आहे. आईच्या उपचारासाठी मुलगी कोल्हापुरात परतली होती. हीच संधी साधत आरोपीने तब्येतीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने तिच्याशी पुन्हा संपर्क वाढवला आणि ऑगस्ट २०२५ मध्ये घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर दोन महिन्यांनी आरोपीच्या मुलाचा शहरातील फ्लॅट असल्याने, त्या ठिकाणी बोलावून पुन्हा अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर मुलीच्या वागण्यात झालेला बदल आईच्या लक्षात आला. संशय बळावल्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने संपूर्ण प्रकार उघड केला. हे ऐकून आईलाही धक्का बसला. त्यानंतर दोघींनी पोलिस मुख्यालयातील महिला कक्षात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी आरोपीला मुरगूड येथून अटक करून न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील करत आहेत. पीडितेच्या वडिलांचे निधन झाले असून आई आणि एक बहीण अशा तिघीच कुटुंबात आहेत. शिक्षक म्हणून असलेली जबाबदारी पायदळी तुडवत, माजी विद्यार्थिनीला वासनांधतेची शिकार बनवल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.