हिंदू असल्याचा अभिमान, कारण ...; युवा दिनी योगी आदित्यनाथांचा ठाम संदेश

    12-Jan-2026
Total Views |
 
Yogi Adityanath
 Image Source:(Internet)
लखनौ:
राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमात तरुणांना उद्देशून प्रभावी आणि ठाम भाषण केले. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, राष्ट्रभान आणि युवकांची भूमिका यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत आत्मविश्वासाचा संदेश दिला.
 
स्वामी विवेकानंदांचे विचार आठवताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, विवेकानंदांनी आपल्या बौद्धिक तेजाने भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख जगासमोर उभी केली. त्यांच्या विचारांमुळे भारताला आत्मसन्मान आणि आत्मभान प्राप्त झाले.
 
हिंदू धर्माबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “मला अभिमानाने सांगायचे आहे की मी हिंदू आहे. आमच्या परंपरेने कधीच कोणाला गुलाम बनवले नाही. मानवतेचे कल्याण हाच आमचा मूलमंत्र राहिला आहे. आमच्याकडे सामर्थ्य असूनही आम्ही ते कधीच कोणावर लादले नाही.” या वक्तव्यातून त्यांनी भारतीय संस्कृतीची सहिष्णु आणि मानवी मूल्यांवर आधारित परंपरा अधोरेखित केली.
 
एका टप्प्यावर भारताची चेतना सुप्त झाली होती, त्याचा फायदा घेत परदेशी आक्रमकांनी देशावर अधिराज्य गाजवले, असे सांगत योगींनी स्पष्ट केले की स्वामी विवेकानंदांसारख्या विचारवंतांनीच भारताला पुन्हा जागृत करण्याचे ऐतिहासिक काम केले.
शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचा उल्लेख करताना योगी म्हणाले की, “मी अभिमानाने हिंदू आहे,” हे विधान केवळ धार्मिक नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी कल्याणाचा संदेश देणारे होते. संकटाच्या काळात भारताने नेहमीच जगाला आधार दिला, असेही त्यांनी नमूद केले.
 
जागतिक घडामोडींवर भाष्य करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आजच्या अस्थिर वातावरणात अनेक देश भारताकडे आशेने पाहत आहेत. “मोदीजी, काहीतरी करा,” असा आवाज जगातून येतो, हे भारतावरील विश्वासाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
 
तरुणांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, युवकांना ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रत्येक पंचायतमध्ये खेळाचे मैदान असावे, युवकांनी खेळाकडे वळावे, यामुळे प्रगती साधता येईल आणि व्यसनांपासून दूर राहता येईल. ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत तरुणांनी या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.