महागाईचे नवे शिखर; सोनं १.४४ लाखांवर, चांदीने २.६५ लाखांचा टप्पा ओलांडला!

    12-Jan-2026
Total Views |
 
Gold and silver
 Image Source:(Internet)
मुंबई :
सराफा बाजारात आज सोन्या (Gold)-चांदीच्या दरांनी सर्व जुने विक्रम मोडीत काढत नवे उच्चांक गाठले आहेत. एका दिवसात झालेल्या जोरदार दरवाढीमुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात तब्बल १४,४७५ रुपयांची उसळी नोंदवली गेली, तर सोन्याच्या किमतीत २,८८३ रुपयांची भक्कम वाढ झाली आहे.
 
आज जीएसटीशिवाय चांदीचा दर २,५७,२८३ रुपये प्रति किलोवर पोहोचला असून, जीएसटीसह चांदीची किंमत थेट २,६५,००१ रुपये प्रति किलोवर गेली आहे. त्याचवेळी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय १,४०,००५ रुपये प्रति १० ग्रॅमवर नोंदवला गेला, तर जीएसटीसह सोन्याची किंमत १,४४,२०५ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे.
 
जुन्या उच्चांकांना मागे टाकले :
शुक्रवारी चांदी जीएसटीशिवाय २,४२,८०८ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आजच्या दरवाढीमुळे चांदीने ७ जानेवारीचा २,४८,००० रुपयांचा विक्रम मोठ्या फरकाने पार केला आहे. त्याचप्रमाणे, शुक्रवारी सोने जीएसटीशिवाय १,३७,१२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर होते. आज सोन्याने २९ डिसेंबर २०२५ रोजीचा १,३८,१८१ रुपयांचा ‘ऑल टाइम हाय’ उच्चांक मोडीत काढला आहे.
 
हे दर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून जाहीर करण्यात आले असून, IBJA दिवसातून दोन वेळा अधिकृत दर प्रसिद्ध करते.
 
कॅरेटनिहाय आजचे सोन्याचे दर :
▪ २३ कॅरेट: १,३९,४४४ रुपये (जीएसटीसह १,४३,६२७)
▪ २२ कॅरेट: १,२८,२४५ रुपये (जीएसटीसह १,३२,०९२)
▪ १८ कॅरेट: १,०५,००४ रुपये (जीएसटीसह १,०८,१५४)
▪ १४ कॅरेट: ८१,९०३ रुपये (जीएसटीसह ८४,३६०)
 
आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, डॉलरमधील चढउतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये ही प्रचंड तेजी दिसून येत असल्याचे बाजारतज्ज्ञांनी सांगितले.