Image Source:(Internet)
नागपूर :
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत महिलांच्या हिताच्या योजनांना विरोध करणे हीच काँग्रेसची भूमिका असल्याचा आरोप केला आहे. “लाडक्या बहिणींना मिळणारी मदत थांबवण्याचा काँग्रेसचा डाव उघड झाला आहे,” असे ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेतून १४ आणि १५ जानेवारी रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची एकत्रित तीन हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हा निधी लवकर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, ही योजना नव्याने जाहीर केलेली नसून दीर्घकाळापासून सुरू आहे. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. याआधीही काँग्रेसने या योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती, यावरून महिलांविषयी काँग्रेसची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
मनपा निवडणुकांमध्ये महिलाच काँग्रेसच्या या राजकारणाला योग्य उत्तर देतील, असा विश्वास व्यक्त करत बावनकुळे म्हणाले की, महिलांचा विश्वास भाजपावर असून सरकार महिलांच्या हिताच्या योजना कोणत्याही परिस्थितीत थांबवणार नाही.
या वादामुळे मनपा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना हा मुद्दा अधिकच तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात या विषयावर राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.