वडोदरा :
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत असून पहिला सामना वडोदरात (Vadodara) खेळवला जाणार आहे. हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण अनेक वर्षांनंतर भारतीय पुरुष संघ वडोदरात आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून तोही एका अत्याधुनिक नव्या स्टेडियममध्ये होणार आहे. भारत–न्यूझीलंड पहिल्या वनडेसह या मैदानावर भारतीय पुरुष संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच सामना रंगणार आहे.
या पार्श्वभूमीवर टीम इंडियामध्ये उत्साहाचं वातावरण असून कर्णधार शुबमन गिलने वडोदराच्या नव्या स्टेडियमबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत. हे मैदान ‘आवडीची जागा’ असल्याचं सांगत गिलने स्टेडियमच्या सुविधांचं विशेष कौतुक केलं.
शुबमन गिल केवळ टीम इंडियात पुनरागमन करत नाही, तर वनडे संघाचं नेतृत्वही प्रथमच सांभाळत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेतृत्व केल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळला नव्हता. आता पुन्हा मैदानात उतरलेला गिल म्हणाला, “हे स्टेडियम खूप सुंदर आहे. इथल्या सुविधा अप्रतिम आहेत. ड्रेसिंग रूममध्ये भरपूर जागा आहे. कोणत्याही स्टेडियममध्ये आम्ही सगळ्यात आधी ड्रेसिंग रूम पाहतो आणि तेच आम्हाला सर्वाधिक आवडलं. मैदानही खूपच चांगलं आहे.”
गिलप्रमाणेच स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाललाही हे नवं स्टेडियम विशेष आवडलं असून खेळाडूंमध्ये सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.
या मालिकेकडे शुबमन गिलसाठी विशेष लक्ष लागलं आहे. “वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ही माझी पहिलीच मालिका आहे. मी या आव्हानाची खूप वाट पाहात होतो. सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळलं असून सगळे चांगल्या लयीत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असं गिलने सांगितलं.
मात्र, या मालिकेत गिलची कसोटी लागणार आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याला अपेक्षित लय सापडली नव्हती. त्यामुळे धावा करण्याचं दडपण त्याच्यावर असणार आहे. याआधी टी-२० मधील सुमार कामगिरीमुळे त्याला वर्ल्डकप संघातूनही डावलण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत वडोदराच्या मैदानावर गिलची कामगिरी सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे.