महापालिका निवडणुकीत पैशांचा गैरवापर; ८ कोटींची रोकड जप्त, १८६ तक्रारी नोंद

    10-Jan-2026
Total Views |
 
Cash worth Rs 8 crore seized
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा (Municipal elections) प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मंगळवारपर्यंत प्रचाराची परवानगी असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा व आमिषांचा वापर होत असल्याचे प्रकार समोर येत असून, यावर राज्य निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत.
 
आचारसंहिता लागू झाल्यानंतर आयोगाच्या भरारी पथकांनी राज्यभरात तपास मोहिमा राबवल्या. या कारवायांमध्ये आतापर्यंत सुमारे ८ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि निवडणुकीशी संबंधित साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे.
 
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या १८६ तक्रारी विविध जिल्ह्यांतून प्राप्त झाल्या असून, त्यातील अनेक प्रकरणांवर चौकशी सुरू आहे. आतापर्यंत ३८ निवडणूकसंबंधित गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे.
 
दरम्यान, आचारसंहिता कालावधीत करण्यात आलेल्या कारवायांचा सविस्तर अहवाल गृह विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त ठेवण्यासाठी आयोगाकडून पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.