कॅसेट किंग गुलशन कुमार हत्या प्रकरणातील दोषी अब्दुल रऊफ मर्चेंटचे निधन; मृत्यूचे कारण समोर

    10-Jan-2026
Total Views |
 
Abdul Rauf Merchant
 Image Source:(Internet)
मुंबई :
‘कॅसेट किंग’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध संगीत उद्योजक आणि टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणातील दोषी अब्दुल रऊफ मर्चेंट (Abdul Rauf Merchant) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका हे त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रऊफ मर्चेंट गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. ३० डिसेंबर २०२५ रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला शहरातील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने ४ जानेवारी २०२६ रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, गुरुवारी सकाळी त्याला पुन्हा तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
गुलशन कुमार यांची हत्या कशी झाली?
१२ ऑगस्ट १९९७ रोजी दक्षिण अंधेरीतील जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर दिवसाढवळ्या गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पूजेसाठी बॉडीगार्डशिवाय आलेल्या गुलशन कुमार यांच्यावर तीन हल्लेखोरांनी तब्बल १६ राऊंड फायरिंग केली. या हल्ल्यात त्यांचा ड्रायव्हरही जखमी झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असतानाच गुलशन कुमार यांचा मृत्यू झाला. अब्दुल रऊफ मर्चेंट हा या तीन हल्लेखोरांपैकी एक होता.
 
हत्या मागचा वाद काय होता?
ही हत्या केवळ व्यावसायिक वादातून झाली नसून, अंडरवर्ल्डकडून बॉलिवूड आणि संगीत उद्योगावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाग असल्याचे तपासात समोर आले होते. ९०च्या दशकात अंडरवर्ल्डकडून गुलशन कुमार यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती नाकारल्यानेच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात अब्दुल रऊफ मर्चेंटला अटक करण्यात आली होती.
 
दरम्यान, २००९ मध्ये पॅरोलवर सुटल्यावर अब्दुल फरार झाला होता. तब्बल आठ वर्षे तो पोलिसांच्या नजरेआड राहिला. २०१६-१७ दरम्यान त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात परत पाठवण्यात आले होते. अखेर आता त्याच्या निधनाने या गाजलेल्या प्रकरणातील एक महत्त्वाचे नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे.