Image Source:(Internet)
नागपूर :
पुणे ते नागपूर (Nagpur) दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अडचण निर्माण झाली असून या मार्गावरील तब्बल २२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दौंड ते मनमाडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ४ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत या गाड्या रद्द राहणार असल्याने हजारो प्रवाशांच्या प्रवासाच्या योजनांवर पाणी फिरले आहे.
मकर संक्रांती, वसंत पंचमी तसेच २६ जानेवारी या सणांच्या पार्श्वभूमीवर आणि लग्नसराई, नोकरी, शिक्षण व वैयक्तिक कामांसाठी अनेकांनी आधीच पुणे–नागपूर–पुणे मार्गावरील रेल्वे तिकिटांचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र ऐनवेळी गाड्या रद्द झाल्याने पर्यायी व्यवस्थेसाठी प्रवाशांना धावपळ करावी लागत आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागांतर्गत दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान मार्ग दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन-इंटरलॉकिंग’ प्रक्रिया करण्यात येत असून ४ जानेवारीपासून सुरू झालेले हे काम २५ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. या कालावधीत पुणे–पंढरपूर, पुणे–नागपूर आणि पुणे–अमरावती मार्गावरील ३० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पुणे–नागपूर–पुणे गरीब रथ एक्स्प्रेस, पुणे–अजनी हमसफर एक्स्प्रेस, अजनी–पुणे हमसफर एक्स्प्रेस तसेच पुणे–नागपूर एक्स्प्रेसचा समावेश आहे. यामुळे विशेषतः मध्यमवर्गीय प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
नागपूर–पुणे हा राज्यातील अत्यंत वर्दळीचा रेल्वे मार्ग मानला जातो. नोकरी, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय आणि वैयक्तिक कारणांसाठी दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. शिक्षण व नोकरीसाठी दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे गाड्या रद्द झाल्याने या प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली असून रेल्वे प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.