(Image Source-Internet)
मुजफ्फरपूर :
जिल्ह्यापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असलेलं साक्रा विधानसभा मतदारसंघातील काटेसर पंचायतीतील मोहनपूर गाव सध्या मोठ्या वादात सापडलं आहे. भूमिहार आणि वैश्य समाज बहुसंख्य असलेल्या या भागात सुमारे ५०० हिंदू कुटुंबं राहतात, मात्र गावात एकही मुस्लिम राहत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
पण, निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये केलेल्या विशेष सुधारणा (SIR) प्रक्रियेनंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत गावकऱ्यांच्या डोळ्यांत धुळफेक झाल्यासारखं चित्र उभं राहिलं. शेकडो हिंदू घरांच्या याद्यांमध्ये २ ते १० पर्यंत मुस्लिम मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
हे साधं चुकून झालेलं नाही– गावकऱ्यांचा आरोप-
निवृत्त आरोग्य कर्मचारी कामेश्वर ठाकूर यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबात ६ सदस्य मतदार आहेत. पण नव्या यादीत त्यांच्या घरात अजून २ मुस्लीम नावं जोडली गेली आहेत. तसंच, मैथुर ठाकूर आणि दिलीप ठाकूर यांच्या कुटुंबांमध्येही अतिरिक्त मुस्लिम मतदारांची भर करण्यात आली आहे.
“ही फक्त चूक नाही, तर मोठं षडयंत्र आहे,” असा आरोप त्यांनी केला.
बंद घरं, मृत मालक – तरीही नवी मतदार नोंदणी-
गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार, अनेक बंद घरांत आणि वर्षानुवर्षे गाव सोडून गेलेल्या लोकांच्या मालमत्तेतही मुस्लिम मतदारांची नावे टाकण्यात आली आहेत.
उमेश ठाकूर यांचं घर कायम बंद असून ते बँकेत नोकरीला आहेत. तरीही त्यांच्या घराच्या मतदार यादीत ८ मुस्लिम नावे दिसतात.
मुन्द्रिका ठाकूर यांच्या मृत्यूनंतर त्यांचं घर ओसाड पडलं आहे. पण नव्या यादीत मृत मुन्द्रिकांसह ८ मुस्लिम नावे दाखवण्यात आली आहेत.
निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा-
“आमच्या गावात एकही मुस्लीम नाही, तरी प्रत्येक घराच्या यादीत त्यांची नावे कशी आली?” असा प्रश्न गावकरी कृष्णकुमार ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली, दौरे झाले, पण अद्याप ठोस कारवाई नाही.
गावकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की, जर चुकीची नावे काढून टाकली नाहीत, तर ते निवडणुकीवर बहिष्कार टाकतील.
राजकीय पार्श्वभूमी-
साक्रा मतदारसंघ २०२० मध्येही चर्चेत होता. तेव्हा जेडीयूचे उमेदवार अशोक चौधरी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला १,५३७ मतांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे मतदार याद्यांमधील हा घोळ मुद्दाम करून निकालावर परिणाम साधायचा प्रयत्न आहे का, असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.