मनोज जरांगे पाटील आक्रमक, सरकारला अंतिम इशारा

    08-Sep-2025
Total Views |
 
Manoj Jarange Patil
 (Image Source-Internet)
जालना :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. कुणबी प्रमाणपत्राचे वितरण १७ सप्टेंबरपर्यंत सुरू झाले पाहिजे, अन्यथा "मोठा निर्णय घ्यावा लागेल," असा इशारा त्यांनी दिला.
 
सरकारला थेट संदेश-
जरांगे म्हणाले, “गावागावातील समित्या कामाला लावा. कॅबिनेट बैठकीत गॅझेटनुसार निर्णय घ्या. कुठलाही बदल न करता नोंद असलेल्या मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या.” मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीला त्यांनी हा थेट संदेश दिला.
 
मराठा समाजाला संयमाचे आवाहन-
सरकारवर टीका करत असतानाच जरांगे यांनी मराठा समाजाला धीर धरण्याचे आवाहन केले. “आपला विजय झाला आहे, पण काहींना तो पचत नाही. अभ्यासक गोंधळले आहेत. थोडा संयम ठेवा, पण अपमान सहन करणार नाही,” असे ते म्हणाले.
 
राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर निशाणा-
आपल्या भाषणात त्यांनी “येवला वाल्याचे ऐकू नका. तुम्ही आमच्या मागे लागलात, तर आम्हीही तुमच्या मागे लागू. कुणबीतून आरक्षण आम्हाला पाहिजेच. वेळ आल्यावर जशास तसे बघू,” अशा शब्दांत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला.
 
दसरा मेळाव्यात मोठा निर्णय?
जरांगे यांनी सूचित केले की, सरकारने वेळेत भूमिका स्पष्ट केली नाही, तर दसरा मेळाव्यात मोठा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकारची भूमिका आणि मराठा आंदोलनाचा मार्ग ठरणार आहे.