उद्याच्या उपराष्ट्रपती निवडणुकीकडे देशाचे लक्ष; संख्याबळाच्या समीकरणात कोण वरचढ?

    08-Sep-2025
Total Views |
 
Radhakrishnan B Sudarshan Reddy
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
भारताच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदी कोण विराजमान होणार याचा निर्णय उद्या (९ सप्टेंबर २०२५) होणार आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव दिलेला राजीनामा स्वीकारल्यानंतर ही निवडणूक घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात थेट लढत रंगणार आहे.
 
राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी-
सत्ताधारी एनडीएकडून माजी खासदार आणि विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उमेदवारीच्या रिंगणात आहेत. संघटननिष्ठ आणि विशेषतः दक्षिणेत भाजपचा विस्तार घडवून आणण्याच्या दृष्टीने त्यांची निवड झाल्याचे म्हटले जाते.
 
तर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे रिंगणात आहेत. निष्पक्षता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारे न्यायमूर्ती म्हणून त्यांची प्रतिमा असल्याने त्यांच्यावर विरोधकांनी विश्वास दाखवला आहे.
 
कोणाचा कोणाला आधार?
लोकसभेत स्पष्ट बहुमत असलेले एनडीए या स्पर्धेत पुढे असल्याचे मानले जात आहे. वायएसआर काँग्रेससह काही प्रादेशिक पक्षांनी उघडपणे राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे.
 
विरोधकांकडे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, राजद, डावे पक्ष, शिवसेना (उबाठा) आणि एआयएमआयएम यांसारख्या पक्षांचे समर्थन आहे. दरम्यान, द्रमुकने आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही, तर बीजेडीनेही निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत राखून ठेवला आहे.
 
आकडेवारी काय सांगते?
निवडणुकीसाठी दोन्ही सभागृहातील ७८२ खासदार मतदान करणार आहेत. यात लोकसभेचे ५४३, राज्यसभेचे २३३ आणि १२ नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. विजयासाठी ३९२ मतांची गरज आहे. सध्याच्या समीकरणानुसार एनडीएकडे ४३५ मतांचे संख्याबळ आहे. त्यामुळे क्रॉस-व्होटिंगसारखा अपवाद वगळता राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
 
मतदान प्रक्रिया कशी?
उपराष्ट्रपतीची निवड लोकसभा व राज्यसभेतील खासदार एकत्रित करतात. मतदान गुप्त ठेवले जाते. ‘प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती’ अंतर्गत ‘सिंगल ट्रान्स्फरेबल वोट’ (STV) प्रणाली वापरली जाते. खासदार उमेदवारांना पसंतीक्रमाने मत देतात. पहिल्या पसंतीत बहुमत न मिळाल्यास, सर्वात कमी मते मिळवणाऱ्या उमेदवाराची मते पुढील पसंतीनुसार हस्तांतरित होतात आणि हा क्रम बहुमत मिळेपर्यंत सुरू राहतो.