टीव्ही अभिनेत्रीला अटक; पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेटचा केला पर्दाफाश

    06-Sep-2025
Total Views |
- टीव्ही अभिनेत्रीला अटक; पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेटचा केला पर्दाफाश

Anushka Mony Mohan Das(Image Source-Internet) 
मुंबई :
काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. या प्रकरणात ४१ वर्षीय टेलिव्हिजन मालिकेतील अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास (Anushka Mony Mohan Das) हिला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही अभिनेत्री ज्युनिअर आर्टिस्टना कामाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून त्यांना या व्यवसायात ढकलत असल्याचं तपासात समोर आलं आहे.
 
या कारवाईत दोन महिला कलाकारांची सुटका करण्यात आली असून त्यांनी टीव्ही मालिकांबरोबरच बंगाली चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आश्रयगृहात हलवलं आहे.
 
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला. आरोपींनी ग्राहकांना मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या काशीमिरा येथील मॉलमध्ये बोलावलं होतं. पोलिसांनी रंगेहात कारवाई करत आरोपींना पैसे स्वीकारताना पकडलं.
 
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३७०(३) (मानव तस्करी) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिनेत्रीला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवलं जात होतं आणि अटक झालेली अभिनेत्री यात मध्यस्थाची भूमिका बजावत होती. तपास यंत्रणांनी रॅकेटमागील इतर दलाल व नेटवर्क शोधण्यासाठी तपास वाढवला असून आणखी काही मोठे धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
 
मनोरंजन क्षेत्रातील ही घटना सर्वत्र खळबळ उडवणारी ठरली आहे. अभिनेत्रीचा अशा घृणास्पद कारवायांमध्ये सहभाग उघड झाल्याने समाजाच्या विविध स्तरांतून आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.