...म्हणूनच कंत्राटदार मला घाबरतात; केंद्रीय मंत्री गडकरींचे विधान

    30-Sep-2025
Total Views |
 
Nitin Gadkari
 Image Source:(Internet)
नागपूर :
इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनंतर आता गडकरींनी मौन सोडत ठाम भूमिका मांडली.
 
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “मी आजवर कधीही कुठल्याही कंत्राटदाराकडून एक रुपयाही घेतलेला नाही. म्हणूनच कंत्राटदार मला घाबरतात.”
 
गडकरी पुढे म्हणाले की, ते जी इनोव्हा गाडी वापरतात ती शंभर टक्के इथेनॉलवर चालते. धान्य, मका, ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आणि प्रदूषणही कमी झाले. याआधी २२ लाख कोटी रुपयांचा खर्च इंधन आयातीसाठी होत असे. आता आयात कमी झाल्याने परदेशी कंपन्यांचा व्यवसाय प्रभावित झाला आणि त्यामुळेच काही लोक माझ्यावर नाराज आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
गडकरींनी सांगितले की नाराज गटाने त्यांच्या विरोधात पेड न्यूज सुरू केल्या. पण त्यांना याची काहीच चिंता नाही. “जनतेचं प्रेम माझ्यासोबत आहे. मी कधीही चुकीची कामं केली नाहीत. कितीही आरोप झाले तरी मी विचलित होत नाही आणि जनता सत्य ओळखते,” असे ते म्हणाले.
 
आजच्या राजकारणावर भाष्य करताना गडकरी म्हणाले, “सध्या आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची रेषा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. हेच आरोप-प्रत्यारोप त्याचं उदाहरण आहे.”
 
शेवटी त्यांनी भावना व्यक्त करत सांगितलं, माझ्यावर कितीही टीका झाली तरी जनता माझ्या सोबत उभी आहे. जनतेच्या सद्भावना आणि स्नेह हीच माझ्या आयुष्यातली खरी ताकद आणि खरी पुंजी आहे.