महायुतीला धक्का? राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची तयारी

    30-Sep-2025
Total Views |
 
Mahayuti NCP Ajit Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई:
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local Body Elections) सामना सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गारुडले असून महायुतीसाठी (Mahayuti) हे आव्हानात्मक ठरू शकते.
 
भाजपची रणनीती काय?
महायुतीत भाजप आणि अन्य घटक पक्षांनी आपापल्या पातळीवर योजना आखली असून, काही जागांवर स्वतंत्र लढाईचा पर्यायही खुला ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी स्पष्ट केले होते की, “जास्तीत जास्त जागा महायुतीच्या बॅनरखाली लढवल्या जातील. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई होऊ शकते, पण आमचा प्राथमिक मार्ग महायुतीच आहे.”
 
राष्ट्रवादीच्या भूमिकेत बदल -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकतेच स्थानिक निवडणुकांविषयी विधान केले. पटेल म्हणाले, “नगरपरिषद व महानगरपालिकांसारख्या स्थानिक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मोठ्या निवडणुकीसाठी महायुती शक्य असली तरी, लहान निवडणुकीत स्वतंत्र लढणे कार्यकर्त्यांना न्याय देईल.” या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की, राष्ट्रवादी स्वतंत्र उमेदवारीसह निवडणूक लढवू शकते.
 
महाविकास आघाडीतील तणाव-
दरम्यान, महाविकास आघाडीत निवडणूक रणनिती अजून निश्चित झालेली नाही. तर राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत युती होईल की स्वतंत्र लढाई, या चर्चा जोरात आहेत.
 
2022 पासून स्थगित असलेल्या स्थानिक निवडणुकांसाठी न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे आणि राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.