Image Source:(Internet)
मुंबई:
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने मराठवाडा (Marathwada) आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड, संभाजीनगर, सोलापूर, परभणी, जळगाव आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाणी पसरल्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला असून, उभी पिके नष्ट झाली आहेत आणि शेतकऱ्यांचा रोजचा उपभोगही धोक्यात आला आहे.
संजय राऊतांचा सरकारवर आरोप-
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर कठोर टीका केली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य करत म्हटले.राज्यातील आपत्ती व्यवस्थापन मंत्री असूनही परिस्थितीवर योग्य नियंत्रण नाही. शेतकऱ्यांना हवी असलेली मदत अजूनही पोहोचलेली नाही. प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जवसुली तातडीने थांबवावी. कर्जमाफी नंतर जाहीर केली जावी."
मदतीबाबत सरकारवर प्रश्न-
राऊतांनी केंद्र सरकारवरही सवाल उपस्थित केला.देशाच्या गृहमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांना भेट देणे आवश्यक आहे, पण ते निवडणूक प्रचार आणि बीसीसीआयच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. शाह, मुख्यमंत्री आणि इतर अधिकारी संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर या भागात गेले नाहीत. मुख्यमंत्री दिसत असला तरी मदत कुठे पोहोचली?"
राऊतांनी सरकारच्या आर्थिक व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.आमदार-खासदारांच्या कामांसाठी आणि निवडणुकीसाठी सरकारकडे प्रचंड निधी आहे. पीएम केअर फंडमध्ये कोटी कोटी रुपये आहेत, पण त्याचा स्पष्ट हिशोब कुठे नाही. हा पैसा निवडणुकीसाठी गुप्त ठेवला जात आहे का?"
सरकारची घोषणा-
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. सरकारच्या माहितीनुसार, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाईल.