पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला ५० हजार कोटी मदत का नाही? उद्धव ठाकरेंचा केंद्रावर सवाल

    27-Sep-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray
 Image Source:(Internet)
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, उद्धवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रावर पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. “पीएम केअर फंडात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, तरीही पूरग्रस्तांसाठी ५० हजार कोटींची मदत जाहीर का होत नाही? पीएम खरंच कोणाची केअर करतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
धाराशीव आणि लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून परतल्यावर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत म्हटले, “शेतकऱ्यांची पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, शेतांमध्ये चिखल साचले आहे. मुलांच्या शाळेची वह्या-पुस्तके वाहून गेली आहेत. अशी गंभीर परिस्थिती आहे, तिथे तातडीने मदत आवश्यक आहे.”
 
मागील वर्षी मार्च २०२३ मध्ये जाहीर झालेल्या १३ हजार कोटींच्या मदतीबाबत ठाकरे म्हणाले, “ही रक्कम अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. पंजाबमध्ये एका हेक्टरसाठी ५० हजार रुपयांची मदत मिळाली, तशीच मदत महाराष्ट्रातही हवी. डबल इंजिन सरकारने त्वरित निर्णय घ्यावा.”
 
भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले, “भाजपचे आमदार-खासदारांनी सर्व पैसे पीएम केअर फंडात दिले. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीवर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. भाजपला प्रशासन चालवता येत नाही, आता गरज आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची.”
 
ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना करत म्हटले, “कोरोना काळात उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी चिता जळत होत्या, पण महाराष्ट्रात आम्ही लोकांची काळजी घेतली, शिवभोजन थाळ्या दिल्या. आजही पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना मदत करणे ही खरी गरज आहे.”