नागपूरच्या नंदनवनात गेमिंग कॅफेत चोरी; लाखोंचा इलेक्ट्रॉनिक माल गायब

    27-Sep-2025
Total Views |
 
Crime news
 Image Source:(Internet)
नागपूर :
नंदनवन परिसरात एका गेमिंग कॅफेत (Gaming cafe) झालेल्या मोठ्या चोऱ्यामुळे खळबळ उडाली आहे. नेहरू नगर भागातील या कॅफेतून चोरट्याने तब्बल ३ लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल चोरून नेल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे, ही घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आली आहे. त्यावरून पोलिसांनी तपासाची दिशा आखली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, साकोलीचे रहिवासी ऋषी चंद्रशेखर गुप्ता हे नेहरू नगरमध्ये गेमिंग कॅफे चालवतात. शनिवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्याने शटर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानात ठेवलेले प्ले स्टेशन कंट्रोलर, सीपीयू, प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क, ग्राफिक कार्ड यांसारखी महागडी उपकरणे घेऊन तो फरार झाला. चोरी गेलेल्या साहित्याची किंमत अंदाजे ३ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
 
या घटनेनंतर गुप्ता यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी शहरात सापळा रचण्यात आला आहे.