मराठवाड्यात महापूर येण्याचे मुख्य कारण म्हणजे हवामानात बदल; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

    25-Sep-2025
Total Views |
 
CM Fadnavis
 Image Source:(Internet)
मुंबई :
मराठवाड्यात (Marathwada) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. धाराशिव, जालना, लातूर, बीड आणि परभणीसह जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरं कोसळली आहेत, शेतं जलमय झाली आहेत आणि शेतकऱ्यांनी कष्टाने पेरलेली पिकं पाण्याखाली गेल्याने आर्थिक हानी मोठी झाली आहे. गावोगावी नुकसानीचे पंचनामे सुरू असून प्रशासन या परिस्थितीत पूर्णपणे काम करत आहे.
 
या महापूरामुळे मराठवाड्याच्या प्रत्येक कुटुंबावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.
 
फडणवीसांचे विधान: हवामान बदलच मुख्य कारण-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूराचे मुख्य कारण हवामान बदल असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांत मराठवाड्याला दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी यासारख्या अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला आहे. हवामान बदलाचा परिणाम या भागात अधिक तीव्रतेने जाणवतो आणि त्याचा सर्वाधिक फटका शेतीवर पडतो. या पूरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे.
 
मराठवाड्यात २१ सप्टेंबरपर्यंत तब्बल २३ लाख ४१४ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे. हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी जागतिक बँकेकडून दिलेले सहा कोटी रुपये शेती सुधारणा व मदतीसाठी वापरण्यात येणार आहेत. फडणवीस म्हणाले की, हवामान बदलाच्या अनुकूल अशी शेती करणे ही काळाची गरज आहे.
 
पुढील काही दिवसही पावसाचा इशारा-
हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवस विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात काही भागात पावसाची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता आहे.
 
राज्य सरकारकडून तातडीने मदत जाहीर होईल अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिक करीत आहेत. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मिळून मदत कार्य करत असली, तरीही वाढत्या पावसामुळे भीतीचे सावट कायम आहे.