रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; मोदी सरकारकडून ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

    25-Sep-2025
Total Views |

Diwali gift for railway employees
Image Source:(Internet)
मुंबई :
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway employees) केंद्र सरकारकडून मोठी दिवाळी भेट जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील तब्बल ११.५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा ७८ दिवसांचा बोनस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा फायदा प्रामुख्याने ग्रुप C आणि ग्रुप D मधील कर्मचाऱ्यांना होणार आहे. यात ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, पर्यवेक्षक, टेक्निशियन, पॉइंट्समन आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा बोनस ‘प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस’ (PLB) म्हणून ओळखला जातो आणि दरवर्षी नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दिला जातो.
थेट खात्यात जमा होणार बोनस
हा बोनस थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाणार असून, वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दिवाळीच्या आधी बोनस मिळाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अर्थव्यवस्थेला चालना
सणासुदीच्या काळात दिल्या जाणाऱ्या बोनसचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही होतो. बोनसची रक्कम बाजारात आल्याने खरेदी-विक्री वाढते, व्यापार व उद्योगांना गती मिळते. अर्थतज्ज्ञांच्या मते, अलीकडेच जीएसटी दरात झालेल्या बदलांसोबत हा बोनसही बाजाराला वेग देणारा ठरणार आहे.
दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा म्हणजे अक्षरशः दिवाळीची गोड भेट ठरली आहे.